Saturday 22 October 2011

जराही प्राण या देहात नाही (तरही गझल)



वृत्त - मृगाक्षी

(लगागागा लगागागा लगागा)



विसरणेही तुझ्या लक्षात नाही 
तुला मी तेवढा अज्ञात नाही 


सुरांना बनविले मी गीत माझे 
कुणी ऐकायला रस्त्यात नाही 


भुलावूनी मला वचनांमधे तू 
अता जागा म्हणे हृदयात नाही


सखे मी चिंब झालो आसवांनी
मनातूनी कशी तू जात नाही?


छबी माझी स्वत: जाळीन मी ही
पुन्हा होणार कोणा ज्ञात नाही 


कसा ठेवू भरोसा मी कुणावर?
अता सामर्थ्य हे शब्दात नाही 


अता ना मोल अश्रुंचे तुझ्याही 
जराही प्राण या देहात नाही 

..... वैभव आलीम (२०/१०/११)

काय सांगू ? (गझल)



वृत्त- मनोरमा

(गालगागा गालगागा)



दु:ख माझे काय सांगू ?
हास्य लाजे काय सांगू ?


मोरपंखी स्वप्न माझे 
अश्रु वाहे काय सांगू ?


शोध घेतो आजलाही 
मीच सांडे काय सांगू ?


साद माझी हरवलेली 
भास नुसते काय सांगू ?


तूच माझे स्वप्न होते
भंगलेले काय सांगू ?

...... वैभव आलीम (१२/१०/११)

ऊठ तू आता तरी (तरही गझल)




वृत्त-कालगंगा

( गालगागा गालगागा गालगागा गालगा )



षंढ म्हणती लोक सारे, ऊठ तू आता तरी
जाण बळ हातात न्यारे, ऊठ तू आता तरी


पेटवा अंगार आता, ऊजळू दे रात ही
घुमव क्रांतीचेच वारे, ऊठ तू आता तरी


का असा लाचार तू ? का प्रश्न ठेवी अंतरी?
मानसी का बावळारे? ऊठ तू आता तरी


ना कुणीही आपले रे, स्वार्थ आहे बाधला
विश्व नाही भास हा रे , ऊठ तू आता तरी


गुंफले मी शब्द माझे, जागवाया चित्त हे 
वैभवाचे बोल घ्यारे, ऊठ तू आता तरी

..... वैभव आलीम (०९/१०/११)