Friday 15 July 2011

दगडी मन




खंत नाही खेद नाही
निर्ढावलेल्या मनाला 
विकायला काढलंय
यांनी भारतभूमीला

होवो दंगा-हाणामारी
वा होवो कुणाचा खून
हे सदैव फिरतात 
गार्डच्या पाठीमागून 

गरीब बिचारा कोणी 
उपासमारीने मेला 
कसली ना चिंता यांना 
मिळतेय ना पोटाला 

कुठे दरोडा पडला
कुठे बॉम्बस्फोट झाला
लुट कुणा,कोण गेला
नवा 'आदर्श' घोटाळा

पैसा नाही विकासाला 
देश कर्जात बुडाला
काळा रुपया सगळा 
स्विस बँकेत जमला 

खंत नाही खेद नाही
निर्ढावलेल्या मनाला 
विकायला काढलंय
यांनी भारतभूमीला

         ......... वैभव आलीम (१४/०७/११)

ती आणि पाऊस


तिला पाऊस आवडायचा
तसा मलाही आवडायचा

तिला चिंब भिजायला आवडायचे
आणि मला मात्र ...
तिला भिजताना पहायला आवडायचे

धुंद बरसणाऱ्या पावसात
धुंदपणे नाचायला
तिला फार आवडायचे
आणि मला मात्र ....
तिची थिरकणारी पावले पहायला आवडायचे

ती मला नेहमी म्हणायची
भिजण्याचा आनंद घेऊन बघ
मग मीच तिला म्हणायचो
अंगावर चिखल किती आहे बघ

पावसात भिजण्याचा आनंद
मी कधी घेतलाच नाही
तिच्या आनंदात मी जरासा
कधीच सामील झालो नाही

आज मात्र मी वाट पाहतोय
पावसाच्या येण्याची
तिच्या आनंदात सहभागी होण्याची

पाऊस आला तरी
ती कधी आली नाही
थिरकणारी पावले तिची
पुन्हा कधीच थिरकली नाही


      ................ वैभव (०७/०६/११)

Saturday 9 July 2011

कधीतरी कोणीतरी....




कधीतरी कोणीतरी
कुठेतरी जन्मले असेल
त्याचं माझं नाते
विधीनेच जुळलेले असेल

कधीतरी कोणीतरी
कुठेतरी जन्मले असेल
हाक माझी ऐकण्यासाठी
आसुसलेलं असेल

कधीतरी कोणीतरी
कुठेतरी जन्मले असेल
कोणत्या तरी वाटेने येईल म्हणून
डोळे लाऊन बसलेलं असेल

कधीतरी कोणीतरी
कुठेतरी जन्मले असेल
माझ्या डोळ्यात येणारे अश्रू
आपल्या हाताने पुसेल

कधीतरी कोणीतरी
कुठेतरी जन्मले असेल
हात माझा हाती घेऊन
माझी प्रेरणा बनेल

कधीतरी कोणीतरी
कुठेतरी जन्मले असेल
दोन जीवांचे अंतर मिटवून
माझ्याशी एकरूप बनेल

खरंच....... कुठेतरी कुणीतरी
नक्कीच जन्मले असेल !!!


    ............ वैभव आलीम (३१.०५.२०११)

शाप का ?


प्रेमगीत आळविता भंगतो आलाप का ?
प्रेमिकांच्या मिलनाला वेदनेचा शाप का ?

तू पहिले, मी पहिले
नजरेला नजर मिळाली
बोलण्या कुणी धजेना
मन हे बेचैन का ?

प्रेमगीत आळविता भंगतो आलाप का ?
प्रेमिकांच्या मिलनाला वेदनेचा शाप का ?

स्वीकार माझा करेल का ?
कि नकार मला मिळेल का ?
मग तिच्याच विचारात आज
झुरते हे मन का ??

प्रेमगीत आळविता भंगतो आलाप का ?
प्रेमिकांच्या मिलनाला वेदनेचा शाप का ?

धैर्य नाही, मग प्रेमांकुर फुलाला का ?
समाजाची मनाला भीती का ?
बोलावे तिच्याशी काही .. तर ..
भोवती संशयाचे जाळे का ?

प्रेमगीत आळविता भंगतो आलाप का ?
प्रेमिकांच्या मिलनाला वेदनेचा शाप का ?

प्रेम करणे कुणावर गुन्हा आहे का ?
प्रेमाला सदैव विरोध का ?
जीवनाचा अंत .. हाच प्रेमाचा शेवट का ??
पवित्र प्रेमाला हा घोर कलंक का ??

प्रेमगीत आळविता भंगतो आलाप का ?
प्रेमिकांच्या मिलनाला वेदनेचा शाप का ?

       
        ................. वैभव आलीम (११.०४.११)

शब्दच जेव्हा रुसून बसले...

 

लेखणी अन वही घेऊन
मी एकांतात गेलो
कविता लिहावी म्हणून
चित्त लावून बसलो

काय लिहावं कसं लिहावं
विचारचक्र मग दौडू लागलं
जुळवणी शब्दांची करता - करता
मनही पार थकून गेलं

लेखणी जरी सरसावली
तरी शब्द काही सुचेना
आजच का असं घडतं ?
काहीच मला उमजेना

कविता लिहिण्यासाठी
यमक काही जुळेना
उमटलेल्या शब्दांचा
अर्थ काही कळेना

प्रथमच मी तेव्हा
स्वत:वरच रागावलो
हळूच कानात आवाज गुंजला
"आम्ही बाबा आज रुसून बसलो"


        ................ वैभव आलीम (१९/०१/११)

नयन तुझे जादुगार


करती घायाळ मनाला
अन हृदयावर वार
खरंच सांगतो
नयन तुझे जादुगार

कधी भासती जणू कट्यार
कधी त्यांस तलवारीची धार
खरंच सांगतो
नयन तुझे जादुगार

ओठांचीही भाषा बोलती
न बोलता शब्द चार
खरंच सांगतो
नयन तुझे जादुगार

व्यक्त करती प्रेम
झुकवून पापण्यांचा भार
खरंच सांगतो
नयन तुझे जादुगार 

        ......... वैभव आलीम (२०.०५.१०)

तू केव्हा येशील?


आठवले ते क्षण कि
मन बेचैन होते
तू केव्हा येशील?
सारखं विचारात असते

हात तुझा हाती अन
ती रम्य सायंकाळ
तू केव्हा येशील?
विचारते ती संध्याकाळ

सोबतीला तू अन
तो खळखळणारा ओढा
तू केव्हा येशील?
भयाण वाटतो ग हा वाडा

स्पर्श जाणवतो तुझा
भेटला होता का तुला हाच वारा
तू केव्हा येशील?
वाट पाहतो केव्हाचा मी
उभा राहून द्वारा .....

    .............. वैभव आलीम (०२.०५.०९)

माता न तू वैरिणी !!!


नैतिकतेची राखरांगोळी
अनैतिकतेचाच बोलबाला
माझ्याच नशिबी हा असा
जन्म का आला ???

कधी घाणीच्या उकिरड्यावर
तर कधी फुटपाथवर
मंदिराच्या पायऱ्याही
झाल्या पापाला आधार !!

द्यायचाच नव्हता जन्म जर
पिंड कशाला जोपासला ??
व्यभिचार करताना
का वाटली नाही लाज मनाला ??

जन्मताच मला टाकताना
कीव नाही आली का तुझ्या मातृत्वाला ??
जन्म देताना विचारलेस मनाला ?
काय गुन्हा होता मी केला ??

आई कशी म्हणू तुला ??
मातृत्वाची तू अभागिनी ...
पोटच्या गोळ्याला मारणारी ..
माता न तू वैरिणी ......
माता न तू वैरिणी ...... !!!!

           .......... वैभव आलीम (२३.१२.१०)

आठवणींचा हिवाळा


कॉलेजच्या आठवणींना
मिळाला उजाळा
आवरावे कसे आता
या बेधुंद मनाला

मज्जा,मस्ती आणि
दांडी मारली तासाला
दिवसच ते बहरायचे
आवर नाही पंखांना

थंडीचे ते दिवसही सरले
भाव मनातील तसेच राहिले
आठवांचे हे महापूर लोटले
भावविश्वही त्यात गुंतले

सुन्या झालेल्या मैफिलीत आज
क्षण हळूच ते डोकावले
मैत्रीच्या महासागरातून ते
तुझ्याचकडे झेपावले

असशील जरी दूर तू
सोबतीला नेहमी मी असेन
हाक दे तू कधीही
साद त्याला माझी असेल

बहार आला थंडीचा कि
दाटतो मनी स्मृतींचा ओलावा
जीवनाच्या या वाटेवर
येईल का पुन्हा ..... "गतवर्षीचा हिवाळा" ?


      .......... वैभव आलीम (१७.१२.१०)

विरहाचे क्षण


आठवणींत तुझ्या मी
रात्र काढली जागून
विरहाने व्याकूळ मी
नसे का गं तुला जाण ?

काळे-काळे हे दाटले घन
पावसाची चातकाने जशी
वाट पहात थांबणं

चकोरालाही हवं जसं चांदणं
तुझ्या भेटीसाठी तसं
आसुसलं माझं मन

नाचती लाटा सागरावरी
पण भेटती किनारी येऊन
घायाळ करती मनाला
हे विरहाचे क्षणं

कधी येईल वसंत
भरेल निसर्ग टवटवी नं
हर्षाने मग कोकीळ गाईल
प्रफुल्लीत गाणं

      ........ वैभव आलीम (२०-०४-१०)

मृत्यूचाही थरकाप झाला


(टीप:- हि कविता सत्य घटनेवर आधारित आहे)

व्यथा मनाची मी सांगू कुणाला ?
आपलं आता मी म्हणू कुणाला ?
कशाला हवेत कोणी सोबतीला ?
असेल जर कलंकच माणुसकीला ..!!

नात्यात ज्या जीव गुंतला
मैत्रीनेच त्याचा गळा घोटाळा
हे पंढरीच्या विठ्ठल्ला
सांग मी काय गुन्हा केला ?

माझ्याच घरात जेवला
लागला मायेचा लळा
ममतेलाच सुरुंग लागला
जेव्हा घरच त्याने उध्वस्त केला ..!!

कसा आवरू या उद्विग्न मनाला ?
नात्यांवरही आता विश्वास ना उरला
नियतीनेही आज मला
असा कसा ठोकरला ?

मित्रत्वाच्या नात्याला
कलंक असा लागला
जीव जडला ज्या नात्यावर
खंजीर पाठीत त्याने खुपसला !!

रक्ताच्या थारोळ्यात पडलेले
कलेवर ज्याने पहिला
तन-मनाची आग झाली
अन ... मृत्यूचाही थरकाप झाला ...!!


     
........... वैभव आलीम (१०-१२-१०)

आज तुझ्या आठवणींत


आज तुझ्या आठवणींत
मी पूर्णपणे गुंतलो होतो
माझे सारे देहभानच
मी विसरून गेलो होतो

तू गेलेल्या वाटेकडे
डोळे लावून बसलो होतो
परत कधी येणार तू
सारखं मनाला विचारत होतो

आज तुझ्या आठवणींत
मी कडक उन्हातसुद्धा तापलो होतो
तुझ्या प्रेमाच्या छायेसाठी
तुझी वाट पाहत थांबलो होतो

तू गेलीस तेव्हा
मी तिळ-तिळ तुटलो होतो
आज तुझ्या आठवणींत
क्षणभर का होईना........ मी जगलो होतो !!!

      ......... वैभव आलीम (१५.०५.१०)

आली दिवाळी


(दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली छोटीशी रचना )





लक्ष्य दिवांच्या उजळीत ज्योती
कुठे समई तर कुठे पणती
आकाश कंदिलाचा साज निराळा
चला मारू ताव फराळा

चकली, करंजी, गुलाबजामून
पाणी सुटले जिलेबी पाहून
गेलो जरी घरामध्ये जेऊन
जाईन तिथे येईन मी खाऊन

पोटोबाला तुडुंब भरून
ऑफिसला सुटटी आजारी पडून
आणखी चार दिवस उपाशी राहून
बघेन होता येते का बरे आपणहून

नाहीच जर फरक एवढे खपून
मग देईन डॉक्टरचे खिसे भरून
आली माझ्या घरी दिवाळी गाऊन
करू आनंद नित्य जीवन जगून

     .......... वैभव आलीम(२६/१०/१०)

शिक्षणाच्या आयचा घो ...



"विद्या विनयेन शोभते"
.... म्हणजेच.......
विनयला विद्या शोभून दिसते

शिक्षणाला आजच्या काय म्हणावे
तेच काही कळेना ..!!
सरळ सोपा अर्थ ऐकून
हसू काही आवरेना !!!

बारा साते किती
सहजच प्रश्न विचारला
एवढेही येत नाही काय रे !! म्हणून ..
कॅल्चुलातोर वर गुणाकार करू लागला !!!

पदवी पूर्ण केलीस .. छान ..
इतिहासाचा प्राध्यापक झालास .. ?
सांग बघू ..कोणत्या बागेत हत्याकांड झाला ?
थांबा हं !! म्हणून .. पुस्तक उघडून वाचू लागला !!!

मराठी भाषा जपतानाही
इंग्रजीने खो घातला ...
मराठी - मराठी म्हणवताना
इंग्लिश चा बोलबाला ....


       .......... वैभव आलीम (२२-११-१०)

अनाथांची "माई" ........ सिंधुताई सपकाळ ..




उतरले नव्हते अजून
पाठीवरील शिक्षणाचे ओझे
लहानपणीच संसारात सांगा
मन कसे रमले हिचे ?

हसण्या - खेळण्याच्या दिवसात असे
मातृत्व हे आले
सासरी नांदताना मात्र
बालपण कधीच हरवले

सुखी संसाराचे स्वप्न पहिले
मग मेघ काळे का दाटले.. ?
तुकड्या - तुकड्याने काळीज फाटले
जेव्हा पतीनेही झिडकारले

इवलासा जीव कुशीत घेऊन
भिक मागितली घरदार असून
मरण हि येईना.. थांबे पुढ्यात येऊन
पोटच्या गोळ्याची करून हाक ऐकून

नियतेनीही बघा हिला कशी फिरवली
मातेनेही कशी दूर लोटली?
घरदार , धनी असून देखील
पोरीला या अनाथ केली ...

पोरके झालेल्या लेकरांची
आस हिला लागली
कोठे होती? कोठे गेली?
अनाथांची हि "माई" बनली ....


    ............. वैभव आलीम (२२-११-१०)

नाते तुझे-माझे




स्वप्नी माझ्या येऊन तू
फक्त गप्पा मारत बसतेस
तर कधी मिठीत येऊन
अचानक निरोप घेऊन जातेस

गप्प राहा ग आता
किती बडबड करतेस ...
सुख - दु:ख वाटताना
माझ्यावर का तू रुसतेस?

दिसलो नाही एकदा जरी
अबोला माझ्याशी धरतेस
आयुष्याची गणितं मांडताना
मैत्री मात्र विसरतेस ...!!!

माझ्याविना तू , तुझ्याविना मी
कधी ना राहू शकलो
तरीही या गोंडस नात्याला
प्रेम नाही म्हणू शकलो ???

बोहल्यावर चढलीस तेव्हा मात्र
नयनी दोघांच्या अश्रू तरळले
भाव नजरेतील सावरताना
लोकांनीही पहिले ...

मैत्री कि प्रेम म्हणावे
कधीच नाही कोणा कळले
नाते तुझे-माझे ..
असे कसे हे जगावेगळे ... !!!!!


       ............ वैभव आलीम (२२-११-१०)

आयुष्याचा खेळ




रस्त्यावरचं जीणं आमचं
दोष नसे विधात्याला
नियतीनेच रस्त्यावर
खेळ असा मांडला

गावोगावी, शहरोशहरी
फिराया मला लागला
तेव्हा कुठे दोन घास
पोरांना खाऊ घातला

चार वर्षांच्या पोरीला
दोरीवरण चालाया लावला
कधी आगीच्या जाळीतून
चिमुरड्याला जाया लागला

उंच काठीवर उभा राहून
तोल कसा हा गेला
काळजाचा तुकडा माझ्या
धरतीला समांतर झाला

खेळ बघून झाला
द्या हो भाऊ काही पोटाला
एक रुपया झोळीत टाकून
जमाव सारा पांगला

हाराकिरीच जीणं जगतो
पोटाची खळगी भरायला
बायको -पोरांना संगाती घेऊन
आयुष्याचा खेळ मांडला !!!!!



....... वैभव आलीम (१८-११-१०)

क्षण असे ते हरवलेले ...


आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!

ती मुलगी होती की जादू , हेच नाही कधी कळले
नजरेतून सुटलेले तीर तिच्या , हृदय माझे चिरत गेले
एकांतातील तिचं बोलण , जेव्हा कानांमध्ये गुंजत
दिवस-रात्रीचा माझ्या चैनच हिरावून नेत
कधी तिचं हसण , कधी लटक रागावण
कधी लाजून तिचं माझ्या मिठीत सामावण

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!

होत कधी असंही , जेव्हा आठवण तिची येते
नजरेतील भाव तिच्या , डोळ्यात माझ्या साठवून जाते
आठवणीने तिच्या , मनाला वेदना अशा होतात
शरीरातून जणू प्राणच माझे घेऊन जातात
आपल्याच धुंदीत चालण , अचानक घाबरून थांबण
कधी फुलांची माला बनून , गळ्यात माझ्या पडण

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!

कधीतरी मला तीच रडवेल , स्वप्नातही नव्हत वाटलेलं
दु:खावर माझ्या हसताना , आभाळ होत फाटलेल
हृदय जिला मी अर्पण केलं , दगडाचं तिचं काळीज असेल
देवदूत समजलो ज्याला , तोच माझा खुनी असेल
तिचं ते रुसण , मी तिला समजावण
निघुनी गेला तो जमाना , होऊनी एकाच क्षण

आजही डोळ्यासमोरून क्षण ते हटत नाही
आठवणींच्या जाळ्यातून मन काही सुटत नाही !!

           ..............वैभव आलीम (०३/११/१०)

का कुणास ठाऊक ....



का कुणास ठाउक ??????
कधी न भेटलेले
कधी न पाहिलेले
चेहरे कधी समोर आले !!!!!!
आणि .... नकळत तेच माझे मित्रही झाले
सुखात आणि दू:खात माझ्या
ते देखिल सहभागी झाले
आयुष्याचे प्रत्येक क्षण त्यानी वाटुन घेतले
जाता जाता .... विसरणार नाही तुला ......
असेही मला सांगुन गेले
पण ........ का कुणास ठाउक ?????
आज तेच चेहरे , तेच मित्र
माझ्यापासून खूप दूर-दूर गेले
का कुणास ठाउक ???
का कुणास ठाउक ?

     
........ वैभव आलीम (२९-०७-०९)

कोणीतरी असावं आपलं

                           कोणीतरी असावं आपलं
भरकटलेल्या वाटेवरून
हात धरून मागे आणणारं

कोणीतरी असावं आपलं
ओघळणाऱ्या अश्रुनाही
हळुवारपणे पुसणारं

कोणीतरी असावं आपलं
सुखात माझ्या सहभागी होणारं
दु:खातही मायेने सांत्वन करणारं

कोणीतरी असावं आपलं
आंधळ्या झालेल्या नेत्रांनाही
डोळसपणे मार्ग दाखवणारं



कोणीतरी असावं आपलं
अंधारातही आपल्यामागे
ज्योती बनून वावरणार

पण ..............

कोणीतरी असण्यासाठी
आपणही त्याचे कोणीतरी असावं



       ......... वैभव आलीम (०८-०४-१०)